Sindhudurg : हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नका, सुरक्षितता पाळा — वनविभागाचा इशारा

 
ब्युरो टीम :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तींपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून, एक हत्ती दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला आहे. सध्या या वन्यहत्तीचा वावर कास, सातोसे, मडुरा आणि रोणापाल या गावांमध्ये सुरू आहे.

वनविभागाकडून हत्तीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी 20 ते 25 कर्मचारी दिवसरात्र पाळत ठेवत आहेत. नागरिक, शेतकरी आणि त्यांच्या शेती व बागायतीचे नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या शेती व फळबागांच्या पंचनाम्यासह नुकसान भरपाईच्या प्रक्रिया जलद गतीने सुरू आहेत.

वनविभागाचे जनतेला आवाहन

हत्ती प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यहत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये, तसेच फोटो, व्हिडीओ किंवा रिल्स तयार करण्यासारखी धोकादायक कृती करू नये. कार्यरत वनकर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

वन्यहत्ती दिसल्यास नजिकच्या वनाधिकारी, वनकर्मचारी किंवा नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक – 02363-272005) येथे तात्काळ संपर्क साधावा.

नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून वनविभागाच्या सूचनांचे पालन केल्यास संभाव्य धोका टाळता येईल, असे आवाहन वनविभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने