ब्युरो टीम : बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे आमिर खान यांच्या चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. शेवटचे ते गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर आता ते पुढे कोणत्या चित्रपटात दिसणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता आमिर खान यांनी आपल्या पुढील योजनांबाबत माहिती दिली आहे. ते अभिनेता म्हणून नेमक्या कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत, याचे नाव त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र, काही चित्रपट त्यांनी निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
१४ मार्च रोजी आमिर खान यांनी आपला ६१ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ते त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना दिसत आहेत. येत्या काळात ते निर्मितीपेक्षा अभिनयावर अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेची जबाबदारी आता अपर्णा पुरोहित सांभाळणार आहेत.
आमिर खान यांनी असेही सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून ते वेगवेगळ्या कथा ऐकत आहेत आणि त्यापैकी काही चित्रपट त्यांनी निश्चित केले आहेत, ज्यावर ते लवकरच काम करणार आहेत.
व्हिडीओमध्ये आमिर खान म्हणाले,“ आमिर विश्वातील चाहत्यांना माझे खूप प्रेम आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येणाऱ्या चित्रपटांसाठी कथा निवडताना मी खूप मेहनत घेत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मी फक्त कथा ऐकत आहे. अखेर काही चित्रपट मी निवडले आहेत, ज्यामध्ये मी काम करणार आहे. माझ्या चित्रपट निर्मिती संस्थेतही मी बराच वेळ देत होतो. आता ती जबाबदारी अपर्णा पुरोहित सांभाळतील. मी अभिनयावर अधिक लक्ष देत आहे. त्यामुळे अभिनेता म्हणून तुम्हाला मला आणखी जास्त काम करताना पाहायला मिळेल, अशी आशा आहे.”

टिप्पणी पोस्ट करा