ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड शहर धुळमुक्त करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, या उपक्रमाला यश मिळवण्यासाठी नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना तसेच बांधकाम व्यावसायिक यांनीही आपली जबाबदारी स्वीकारून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील स्वच्छतेकडे जागरूकतेने लक्ष दिल्यास पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनू शकते. ‘धुळमुक्त पिंपरी चिंचवड शहर’ या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम लोकचळवळ बनवावी, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पुनावळे येथील ७ प्लमेरिया ड्राईव्ह सोसायटी येथे आयोजित धुळमुक्त शहर अभियान जनजागृती बैठकीत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना महापौर रवि लांडगे बोलत होते.
या बैठकीस उप महापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगर सदस्या रेश्मा भुजबळ, नगर सदस्य कुणाल वाव्हळकर, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव, संत तुकाराम महाराज साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, शलाखा बोडांवार, गजानन सूर्यवंशी, गणेश पायाळ यांच्यासह महापालिकेचे सह शहर अभियंता सुनिल भागवानी, कार्यकारी अभियंते सोहन निकम, योगेश आल्हाट, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, शांताराम माने यांच्यासह सोसायटी चेअरमन गणेश भामे, सामाजिक संघटना प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर वेगाने विकसित होत आहे. विकासकामांमुळे काही ठिकाणी धुळीची समस्या निर्माण होत असली तरी प्रशासन योग्य नियोजन व उपाययोजनांच्या माध्यमातून ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहर स्वच्छ आणि धुळमुक्त ठेवण्यासाठी केवळ महापालिका प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नसून नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवून आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करून नागरिकांनी या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे धुळमुक्त पिंपरी चिंचवड अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी धुळमुक्त शहर ही काळाची गरज असून यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीदरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक प्रतिनिधी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धुळमुक्त शहरासाठी विविध सूचना मांडल्या. शहरातील रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी करणे, बांधकाम स्थळांवर योग्य त्या उपाययोजना करणे, रस्ते स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविणे, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सूचनांची दखल घेत महापौर रवि लांडगे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
महापौर रवि लांडगे यांनी शहरातील वाढते बांधकाम, वाहतूक व विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या समस्येबाबत प्रशासन विविध उपाययोजना करत असल्याची माहिती दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर यांत्रिक पद्धतीने साफसफाई, पाण्याची फवारणी, बांधकाम स्थळांवर संरक्षक जाळी लावणे, मलबा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि धुळमुक्त करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर यांनीही शहर स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी महापालिकेच्या उपक्रमांना सहकार्य करून धुळमुक्त शहराच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्रितपणे काम करण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव यांनी ‘धुळमुक्त पिंपरी चिंचवड शहर’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
लोकचळवळ जागवा – पर्यावरण वाचवा” या पर्यावरण विषयक पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण पृथ्वीराज शिंदे व त्यांच्या टीमकडून करण्यात आले. या पथनाट्यातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि धुळमुक्त शहरासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा