Maharashtra Weather : 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा


ब्युरो टीम : 
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात 4 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या तीन दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे, घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण होणे तसेच काही ठिकाणी किरकोळ संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक असल्यास हवामानाचा अंदाज व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची माहिती घेऊनच प्रवास करावा.

विशेषतः सखल भागात राहणारे नागरिक, घाट परिसरातून प्रवास करणारे वाहनचालक तसेच समुद्रकिनारी जाणारे पर्यटक यांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक :

• बृहन्मुंबई महानगरपालिका – 1916
• पालघर जिल्हा – 02525-297474 / +91 82379 78873
• ठाणे महानगरपालिका – 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
• ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108 / +91 86578 87101
• रायगड आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 02141-222097 / +91 82751 52363
• पनवेल महानगरपालिका – 022-27458040 / 41 / 42

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने